Ticker

6/Breaking/ticker-posts

पोपटरावांना आरक्षणाचा फटका !

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

अहमदनगर: आदर्शगाव हिवरे बाजारचे सरंपचपद महिलेसाठी आरक्षित झाल्याने ग्रामविकासाचे प्रवर्तक  पोपटराव  पवार यांची सरपंचपदाची संधी पुन्हा हुकली आहे. आता त्यांना उपसरंपचपद दिले जाण्याची शक्यता आहे. सलग चौथ्यांदा या गावाचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. तीस वर्षांनंतर यावेळी निवडणूक होऊन पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजयी मिळविला आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले होते.

यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी सरंपचपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जात होती. त्यामुळे निवडणूक लढविताना तो विचार करूनच उमेदवार दिले जात. यावेळी मात्र सदस्यांची निवड झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण ठरविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गावांत दिग्गजांची मोठी कोंडी झाली. त्यातच हिवरेबाजारचाही समावेश आहे. नगर तालुक्यातील गावांच्या सरपंचपदाची सोडत आज काढण्यात आली. त्यामध्ये हिवरे बाजारचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. या गावात पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्व विजयी झाले आहेत. आता यातील तीन पैकी एका महिलेला सरपंचपदाची संधी मिळेल. तर पवार यांच्याकडे उपसरपंचपद सोपविले जाण्याची शक्यता आहे. प्रथमच निवडणुकीने जिंकून गावातील वर्चस्वावर शिक्कामोर्तब केल्यानंतरही पवार यांची सरपंचपदाची संधी हुकली आहे.

मुख्य म्हणजे या गावातील सरपंचपद सलग चौथ्यांदा राखीव राहिले आहे. यापूर्वीही महिला आरक्षण होते, एकदा ओबीसी पुरुष तर एकदा ओबीसी महिला आरक्षण होते. सरंपचपद आरक्षित राहिल्यावर पवार यांच्यावर उपसरपंचपदाची जबाबदारी देण्यात येत होती. आता त्याच पद्धतीने पुन्हा कामकाज करावे लागणार आहे. यापूर्वी निवडणूक  बिनविरोध होत असे. यावेळी मात्र, बिनविरोधला विरोध झाला. विरोधकांनी पॅनल उभा केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पवार यांच्या नेतृत्वावरच गावाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सरपंचपदाकडे लक्ष लागले होते. गावाने विश्वास दाखवून सत्ता दिली असली तरी आरक्षणामुळे पद मात्र मिळू शकत नाही, अशी स्थिती पवार यांची झाली आहे.याबाबत पवार यांनी  पदापेक्षा आपले कामाला  आणि विकासाला प्राधान्य राहिले आहे, त्यामुळे पदात फारसे स्वारस्य राहिलेले नाही अशी प्रती क्रिया व्यक्त केली.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या