नगरच्या कोके पाटलांकडे सापडले जुने मोडी लिपीतील दस्तावेज
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).
गणेशोत्सव विशेष....
अहमदनगर : शहराचे ग्रामदैवत व अवघ्या नगरकरांचे आराध्यदैवत असलेला माळीवाड्यातील श्री विशाल गणेश चक्क साडेसातशे ते आठशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. बाराव्या शतकातील त्याच्या अस्तित्वाचे पुरावे मोडी लिपीत मिळाले असून, नगरमधील उद्योजक व हॉटेल व्यावसायिक विनायक नामदेवराव कोके पाटील यांच्याकडे हे दस्तावेज उपलब्ध आहेत. 1490 मध्ये नगर शहराची स्थापना झाल्याचे सांगतात, पण त्याच्या हीआधी सुमारे दोन-अडीचशे वर्षेपासून माळीवाड्यात विशाल गणेश भाविकांना दर्शन देत आहे. त्या काळात मुली सरकार येथे होते व त्यानंतर निजामशाही व कंपनी सरकारची (ब्रिटीश) वाटचाल नगरच्या मातीने अनुभवली. पण विशाल गणेशाचे भव्य रुप तेव्हा पासूनच नगरकरांच्या कित्येक पिढ्यांच्या मनात घर करून आहे.
नगरच्या माळीवाडा परिसरातील कोके पाटील घराण्याlचा इतिहास सुमारे 830 वर्षां पासूनचा आहे. 1191 पासूनच्या या घराण्याच्या इतिहासाची माहिती त्यांच्या कडे उपलब्ध आहे. मोडी लिपीतील या माहितीचा शोध घेताना विनायक नामदेवराव कोके पाटील यांना घरात आणखी काही जुनी कागद पत्रे सापडली. मोडी लिपीतील या कागदपत्रांचे त्यांनी नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील मोडी लिपी वाचक नारायण आव्हाड यांच्या कडून देवनागरी मध्ये लिप्यंतर करून घेतल्यावर त्यांना ही आश्चर्याचा धक्का बसला. श्री विशाल गणेश मंदिर अस्तित्वात असल्याची 1260 साला मधली कागद पत्रे ती होती. त्यात देवाची पूजा अर्चा, देवाची जमीन, खर्च-उत्पन्न अशी माहिती आहे. म्हणजे त्याच्या ही आधी पासूनच विशाल गणेश अस्तित्वात आहे. त्याची स्थापना कोणी केली, त्याचे असे विशाल रुप कसे झाले, वगैरे काहीही माहिती या कागद पत्रांतून नाही. पण या निमित्ताने नगरच्या श्री विशाल गणेशाचा इतिहास तब्बल 761 वर्षे जुना असल्याचे स्पष्ट होत आहे व त्यामुळेच इतिहास व धार्मिक अभ्यासकांनी आता हा इतिहास अधिक खोलात जाऊन शोधण्याची गरज आहे. जुन्या कोणत्या पोथ्या पुराणात नगरच्या विशाल गणेशाचा उल्लेख आहे की नाही, हे ही आता नव्याने पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
*ताळीकेनगर...होते नाव*
विशाल गणेश मंदिरासंदर्भातील कागद पत्रां मध्ये...हजरी बुकातील रोज नंबर 177 ताळीके नगर,मौजे माळीवाडा तर्फ नगर हवेली. सन 1260 फसली सालचे हीसेबास जमीन दाखल आहे ती...असा उल्लेख असून, जमीन 10 बीघे (म्हणजे आजच्या हिशेबाने सुमारे 5 एकर) श्री गणपती वहिवाटदार धोडो भवानी याचे पुज्यारी तर्फ जे भगवंत भट बीन मनभट...असे लिहिलेले आहे व ही कैफियत 8 मार्च 1854 रोजी भगवंत कारकुन मामले यांनी लिहिली असून, यात भगवंत भट बापाचे नाव मन भट आज्याचे नाव राघोभट आडनाव पाटक...असे नमूद आहे. मांडवगणकर जात देशस्त ब्राम्हण कसब पुज्यारी पणाचे व भीक्षुकीचे उमर वर्षे अजमासे 30...असे नमूद करून, आमच्या कडे इनाम जमीन गणपती देव बद्दल 10 बिघे चालत आलेली असून, याज बद्दल सरकारास पटी द्यायची नाही, ही जमीन मुली सरकार खालसातून कोणी दिली, कधी दिली काहीही माहिती नाही,जमिनीचा मूळ संपादक कोण माहीत नाही, सदरहू देव याची चाकरी,पूज्या वगैरे दीवाबत्ती, नैवदय, झाडलोट, दागदुजी करून इनामची वहीवाट करीत आहो वती मोजे मार येथील पाटील कुलकर्णी यांचे विचाराने करीत आहो, असे नमूद करताना 1227 फसली साली मुली अमल दूर जाहला तेव्हा सदरहू जमिनीची वहिवाट आमचा बाप मन भट बीन राधो भट करीत होता, तो मूळ संपादकाचा कोणी होता की नाही, याची माहिती नाही, असा ही उल्लेख असल्याने विशाल गणेश मंदिर 794 वर्षां पूर्वीचे असावे, असेही स्पष्ट होते. पण या दृष्टीने पुढे कागद पत्रात काही उल्लेख नाही.
कंपनी सरकारची जप्ती नाही
1227 फसली साला पासून कुंपनी (कंपनी नव्हे) सरकारचा अमल सुरू, पण जप्ती वगैरे दिक्कत जाहली नाही, तसेच सदरहू जमिनीची लागवड वजा जाता दरसाल उत्पन्न आजमासे 6 रुपये-सरकारास काही द्यावयाचे नाही, बाकी एन नफा आम्हाकडे राहतो तो सदरी नवे कलमी लिहील्या प्रमाणे देवाकडे खर्च करीतो,आम्हास नफा काही राहात नाही,असे स्पष्ट करून 15 कलमांचा हा दस्तावेज पुरुषोत्तम गोवींद हुजुर कारकून, भगवंत कारकून मामलेदार, तपास रामचंद्र बाबूराव कारकून यांनी 19 माहे मे सन 1854 रोजी लिहून घेतल्याचे म्हटले आहे व यात कैफियत देणारे भगवंत भट यांच्या वंशावळीचा ही उल्लेख आहे.
नगरच्या श्री विशाल गणेशा संदर्भातील जुने मोडी लिपीतील दस्तावेज विनायक कोके पाटील यांना सापडल्यावर त्यांनी त्यांचे भाषांतर करून घेतले व त्यातून श्री विशाल गणेशाच्या सुमारे 700 ते 800 वर्षां पूर्वी पासूनच्या अस्तित्वाची साक्ष मिळत आहे. नगर शहराची स्थापना अहमद निजामशहा याने 1490 मध्ये केल्याचे सांगतात, पण यानुसार आता पर्यंतच्या सुमारे 530 वर्षांच्या शहर स्थापनेच्या इतिहासाच्या आधी दोनशे ते अडीचशे वर्षे विशाल गणेश नगर मध्ये आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या इतिहासाचे अधिक संशोधन अभ्यासकां कडून होणे आवश्यक आहे. त्यामुळे मोडी लिपीतील मूळ कागदपत्रे व भाषांतरीत कागदपत्रे विनायक कोके पाटील गणेशोत्सव काळात श्री विशाल गणेश मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराजांकडे विधीवत सुपूर्द करणार आहेत.
दरम्यान,श्री विशाल गणेश भाविक व इतिहास अभ्यासकांना मोडी लिपीतील ही कागदपत्रे पाहण्यास उपलब्ध असून, इच्छुकांनी वाडियापार्क येथे विनायक कोके पाटील(फोन नंबर-9922663493) व प्रसाद कोके पाटील (फोन नंबर-9922141001)यांच्याशी संपर्क साधावा.
* शतक महोत्सवी नाथपंथीय परंपरा *
श्री विशाल गणेशाची नाथपंथीय पूजापरंपरा सुमारे 100 वर्षांच्या आधी पासूनची असावी, असे मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांनी सांगितले. आमचे गुरू (स्व.) गेंडानाथ महाराजांच्या आधीपासून चालत आलेली ही परंपरा आजही सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, आमच्या नाथ परंपरेनुसार गणपती हा नवनाथांपैकीच सहावा नाथ आहे. त्या मुळेच नाथपंथीय मंत्रोच्चारानुसार रोज सकाळी व संध्याकाळी श्री विशाल गणरायाची पूजा केली जाते. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनेही पूजा-आरती होते. ओंकार आदिनाथ, उदयनाथ पार्वती,सतनाथ ब्रह्मा, संतोषनाथ विष्णू, अचेले अचंबे नागनाथ, गजभेली गजकंथडनाथ म्हणजे गणपती, ग्यानपारखी सिद्धचंद्रमा चौरंगीनाथ, मायास्वरुपी दादा मच्छिंद्रनाथ वज्योतीस्वरुपी गुरु गोरक्षनाथ असे नऊ नाथ आमच्या नाथ परंपरेत आहेत. यानुसार श्री विशाल गणेशाची आराधना केली जाते. या विशाल गणेश मूर्तीच्या खाली नाथसंप्रदायाची समाधीही आहे. जागृत देवस्थान म्हणून श्री विशाल गणेश प्रसिद्ध आहे व त्याची प्रचिती भाविकांना नेहमी येते, असेही संगमनाथ महाराजांनी सांगितले.
आत्मलिंगधारण करणारा
नगरचा श्री विशाल गणेश सव्वा अकरा फूट उंच व सुमारे सात फूट रुंद आहे. मंदिराची कळसा पर्यंतची उंची 75 फूट आहे. पूर्वाभिमुखी, चतुर्भुज तसेच उजव्या सोंडेचा असलेल्या या गणपतीने बेंबीत आत्मलिंग व त्यावर नागफणी धारण केलेली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या डाव्या हातात मोदक असून, उर्वरित तीनही हात आशीर्वाद स्थितीत आहेत. एकाच वेळी तीन हातांनी आशीर्वाद देणारी दुर्मिळ मूर्ती अन्य कोठेही पाहण्यास मिळणे अवघड आहे. श्रींची मूर्ती कणाकणाने वाढत जात होती म्हणून डोक्यावर त्रिशूळ ठोकण्याचे कुणातरी भक्ताच्या स्वप्नात सांगितले गेल्याने या मूर्तीच्या डोक्यावर त्रिशुळ आहे. मंदिरात त्रिकाल कडक पूजा अर्चा होते. रोज रात्री पावणे आठ ते साडेआठ या दरम्यान होणारी नाथ पंथीय आरती व त्यावेळी वाजवल्या जाणार्या वाद्यांचा वैशिष्ट्यपूर्ण ताल व सूर उपस्थित भाविकांच्या अंगावर रोमांच उभे करणारा असतो. त्यामुळे नगरचा श्री विशाल गणेशाला प्रदीर्घ ,प्राचीन धार्मिक परंपरा व अधिष्ठान असल्याचे सिद्ध झाले आहे. गणरायाला त्रिवार वंदन...!
-
0 टिप्पण्या