Ticker

6/Breaking/ticker-posts

कारगिल युद्धातील लढाऊ कर्नल किसनराव काशिद यांचे निधन

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल किसनराव काशिद (वय ८४) यांचे गुरूवारी निधन झाले. १९७१ च्या कारगिल युद्धात त्यांनी भाग घेतला होता. लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गेल्या २४ वर्षांपासून ते अहमदनगरच्या न्यायालयात वकिली करीत होते.

जामखेड तालुक्यातील सारोळा हे काशिद यांचे मूळ गाव. त्यांनी विधी शाखेची पदवी मिळवून १९६२ मध्ये नगरला वकीली सुरू केली. मात्र, चीनसोबत झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर लष्करात भरती सुरू झाली. तेव्हा तेही सैन्यात सेकंड लेफ्टनंटपदी दाखल झाले. भारत-चीन सीमेवर त्यांनी बराच काळ काम केले. १९७१ मध्ये कारगिल युद्धात त्यांच्या गुरखा राफल्सने पराक्रम गाजविला. १९७१ मध्ये डिसेंबर महिन्यात कारगिलमध्ये जाऊन पाकिस्तानच्या चौक्यांवर जाऊन हल्ला करण्याचा आदेश त्यांना मिळाला. तेव्हा ते डेल्टा कंपनीचे कमांडर होते. आदेशाप्रमाणे त्यांनी कॅमल्स बॅक चौकीवर सहकाऱ्यांसह हल्ला चढविला. ती चौकी ताब्यात घेतली. या युद्धाच्या तसेच १९६५ च्या भारत -चीन युद्धासंबंधीच्या अनेक आठवणी ते सांगत.

वकीली सोडून ते सैन्यात भरती झाले, त्याचेही असेच कारण आहे. पुण्यातून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी अहमदनगरमध्ये वकिली सुरू केली होती. मात्र, चीनच्या युद्धा दरम्यान तत्कालीन राष्टपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत काशिद काही महिन्यांची वकिली सोडून सैन्यात सेकंड लेफ्टनंटपदी भरती झाले. प्रशिक्षण घेऊन थर्ड गुरखा रायफल्समध्ये दाखल झाले. तवांग येथे त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा युद्ध नुकतेच संपले होते. त्यानंतर बराच काळ गलवान खोऱ्यात त्यांनी काम केले.


१९७१ मध्ये त्यांच्या गुरखा रायफल्सला पराक्रम गाजविण्याची संधी मिळाली. निवृत्तीनंतर ते नगरला परत आले. पुन्हा वकिली सुरू केली. अनेक नवोदित वकिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. विविध सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. १९९९ त्या कारगिल युद्धाच्यावेळी आयोजित उपक्रम आणि कार्यक्रमांत त्यांनी पुढाकार घेतला. या माध्यमातून जुन्या युद्धांच्या आठवणी त्यांनी नगरच्या नागरिकांना सांगितल्या. त्या युद्धात शहीद झालेल्या नगरमधील जवानांना मदत मिळवून देण्यातही त्यांचा पुढाकार होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या